साने गुरुजी जयंती निमित्त प्रश्नमंजुषा

 साने गुरुजी जयंती निमित्त प्रश्नमंजुषा

👉साने गुरुजी यांचा जीवन परिचय थोडक्यात वाचून खालील टेस्ट सोडवा.

साने गुरुजींचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे 24 डिसेंबर 1899 ला  झाला.  साने गुरुजींच्या आजोबांच्या वेळी त्यांची परिस्थिती अत्यंत वैभवसंपन्न होती त्यांचे घराणे खोताचे काम करीत. पुढे वडील सदाशिवरावांच्या काळात मात्र आर्थिक परिस्थिती ढासळत गेली, एवढी की घरादारावरही जप्ती आली. त्यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा फार प्रभाव पडला. तिने केलेल्या संस्कारांमुळे साने गुरुजी घडले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमळनेर इथं प्रताप विद्यालयात त्यांनी शिक्षकाची नौकरी स्वीकारली. याठिकाणी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सांभाळतांना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली, विद्यार्थ्यांचे ते सर्वाधिक आवडते शिक्षक झाले. अमळनेर या ठिकाणी साने गुरुजींनी प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं तत्वज्ञानाचा अभ्यास देखील केला.

1928 साली साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार प्रभाव होता. स्वतःच्या जीवनात देखील ते खादी वस्त्रांचाच वापर करीत असत. समाजातील जातीभेदाला, अस्पृश्यतेला, अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी कायम विरोध केला. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या साने गुरुजींनी 1930 साली शिक्षकाची नौकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली. 

1942 च्या चळवळीमधे भूमिगत राहून सानेगुरुजीनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले, धुळे येथे कारागृहात असतांना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली ‘गीताई’ लिहिली.

लहान मुलांच्या बाल मनावर चांगल्या संस्कारांची बीज पेरली जावीत म्हणून गुरुजींनी विपुल लेखन केलं. आपल्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम होतं, हे त्यांनी लिहिलेल्या “श्यामची आई” या पुस्तकातून आपल्याला कळत, जाणवतं. श्यामची आई या पुस्तकातून त्यांनी आपल्या आईच्या सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत.  साने गुरुजींचं मन अत्यंत भावनाप्रधान आणि संवेदनशील होतं त्यामुळे आईने ज्या सदभावना त्यांच्यात रुजवल्या त्याची वाढ त्यांच्यात वेगानं झाली.


अमळनेर, धुळे आणि नाशिक इथं काही काळ त्याचं वास्तव्य होतं. पुढे खान्देशला त्यांनी आपली कर्मभूमी बनविलं. प्रांताप्रांतातील भेदभाव दूर व्हावा आणि सर्वत्र बंधूप्रेमाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी साने गुरुजींनी आंतरभारती ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. साहित्य संमेलनात तशी इच्छा त्यांनी बोलून देखील दाखवली होती.

त्याकरता त्यांनी पैसा गोळा केला होता, रवीन्द्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आंतरभारती संस्था स्थापन करण्याचा त्यांचा मनोदय होता.

साने गुरुजींचे निधन –

11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे निधन झाले.

बलसागर भारत होवो…विश्वात शोभूनी राहो

राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो…

या साने गुरुजींनी लिहिलेल्या कवितेने त्यावेळी नागरिकांवर प्रभाव वाढला होता. त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्या काव्यपंक्ती देखील जप्त केल्या होत्या.

टेस्ट सोडवा